नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत भीषण अपघात : २ ठार तर ३८ तीव्र जखमी
वाकणनाक (सुनिल कोकळे)
शुक्रवार (३ एप्रिल) : नागोठणे जवळील सुकेळी खिंडीतील कोलाड दिशेकडील उतारावरील रस्त्यावर पहाटे अडीचच्या सुमारास भीषण बस अपघात घडला. मुंबई येथील ओमकार ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस पलटी झाल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरात खळबळ उडाली.
याबाबत नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-मुंबई बाजूकडून गोव्याच्या दिशेने सुमारे ४५ प्रवासी घेऊन जाणारी ओमकार ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) शुक्रवार पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास सुकेळी खिंडीत आली. यावेळी घाटातील चढावावरील तीव्र वळणावर चालक हेमंत कुमार पाटील (वय 36, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याने अती वेगात वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी झाली.
या भीषण अपघातात नीलम वैभव विभूते (वय 40, रा. पनवेल) आणि नाईम निजाम शेख (वय 33, रा. कामोठे, पनवेल) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तत्काळ नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी पनवेल येथील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने संयुक्तरीत्या मदतकार्य केले. काही प्रवासी बसखाली अडकले होते, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या प्रकरणी बस चालक हेमंत कुमार पाटील याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश मारकंडे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, सुकेळी खिंड ही गेल्या अनेक दशकांपासून अपघातासाठी सुपरिचित असून देखील स्थानिक वाहतूक पोलीस या ठिकाणी चौकी का उभारत नाहीत?स्थानिक नागरिकांच्या मते सुकेळी खिंड ही अपघातग्रस्त म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही या खिंडीत अनेक गंभीर अपघात घडले असून या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे. दरम्यान या घटनेमुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे.

