नागोठणे येथे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
वाकणनाका (सुनिल कोकळे) दि. ११ एप्रिल :
एस.आर. दळवी (I) फाऊंडेशनतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नागोठणे येथील श्रीमती गु.रा. अग्रवाल विद्यामंदिरात उत्साहात पार पडला.
दरम्यान २६ जानेवारी रोजी नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा निकाल जाहीर करून शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, प्राचार्य डी. एम. पवार, वाहतूक पोलीस मनोहर माळी, प्रवीण पाटील,दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, कलाशिक्षक दशरथ गोसावी, रवींद्र कोष्टी, सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड तसेच मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, शिक्षिका संध्याराणी सरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अपर्णा दांडेकर, निधी शिर्के, देव गोसावी आणि रिया सिंगवा या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच पोलीस व विद्यार्थी यांच्यातील मैत्रीपूर्ण नातेसंबंधाबाबतही त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संध्याराणी सरगडे यांनी केले.

