सुदर्शन सीएसआर फाउंडेशनतर्फे ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती वितरण; मेहेंदळे महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांना लाभ

सुदर्शन सीएसआर फाउंडेशनतर्फे ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती वितरण; मेहेंदळे महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांना लाभ

वाकणनाका (सुनिल कोकळे) : रोहा जवळील धाटाव एमआयडीसी येथील सुदर्शन केमिकल कंपनीत गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात को. ए. सो. मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावीतील २८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे, रायगडच्या पोलीस अधिक्षक आंचल दलाल, सुदर्शनचे विभाग प्रमुख विवेक गर्ग, ग्लोबल प्रमुख शिवालिका राजे, सीएसआर प्रमुख माधुरी सणस, रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दज,माजी नगराध्यक्ष समीर शेडगे गटनेते महेंद्र गुजर, बांधकाम सभापती राजेंद्र जैन, जीवराज चोळे यांच्यासह परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना.अदितीताई तटकरे म्हणाल्या की “विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न जिद्द आणि मेहनत तसेच चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत कार्यशील राहावे व आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे” असेही त्या शेवटी म्हणाल्या.

रोहा येथील मेहेंदळे महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश मोसे यांच्या अथक प्रयत्नातून सुदर्शन कंपनीच्या ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना मिळत आहे. यावर्षीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक संग्राम गायकवाड,परशुराम परिहार, सुनंदा साळुंखे यांच्या सहकार्याने २८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यश आले.

सदरील कार्यक्रमात कु. रुचिता मांडलेकर या विद्यार्थिनीला राज्याच्या कॅबिनेट मंत्री ना. अदिती ताई तटकरे तसेच रायगड जिल्हा अधिक्षक आंचल दलाल यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, ही विशेष बाब ठरली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही याच महाविद्यालयातील विद्यार्थी निल पिंपळे याने करून उपस्थितांची दाद मिळवली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यासपीठ मिळाले असून त्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!