स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नागोठण्यात २०० सायकलींचे वाटप; दादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार : राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांचे भावनिक मनोगत

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नागोठण्यात २०० सायकलींचे वाटप; दादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार : राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांचे भावनिक मनोगत

नागोठणे (शामकांत नेरपगार) :
महाराष्ट्राचे माजी लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. बुधवार (दि. २२ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील विद्यार्थ्यांना एकूण २०० सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा भावपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “स्व. अजितदादा पवार यांची आठवण कायम आपल्या स्मरणात राहावी, या उद्देशाने हा सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान कडून व नागोठणे शहर व विभाग राष्ट्रवादीच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दादा नागोठणे येथे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे कौतुक केले. लहानातील लहान कार्यकर्त्यालाही महत्त्व देण्याचा त्यांचा गुणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे करण्यामागे कारणीभूत ठरला.”
                ते पुढे म्हणाले की, “दादांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाभिमुख कामे केली. पक्षभेद न करता प्रत्येकाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश केला, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे. खासदार सुनील तटकरे, नामदार अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नागोठण्यात विकासाची गंगा आणून जनतेच्या मनात समाधान निर्माण करणे, हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
              कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
              या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, नागोठणेच्या सरपंच सुप्रिया महाडिक, माजी सरपंच विलास चौलकर, लियाकतशेठ कडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभागाध्यक्ष संतोष कोळी, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, चंद्रकांत गायकवाड, संजय भोसले, मनोहर सुटे, सचिन कळसकर, ग्रामपंचायत सदस्य अकलाख पानसरे, ॲड. प्रकाश कांबळे, शहर सचिव रोहिदास हातनोलकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, शहर उपाध्यक्ष प्रतिभा तेरडे, प्रगती आवाड, निष्ठा विचारे, ग्रामपंचायत सदस्या पुनम काळे, अमृता महाडिक, भाविका गिजे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक तसेच भारतीय एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!