खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात; समृद्धी कोळी व संतोषभाई कोळी यांच्याकडून पाण्याच्या जारचे वाटप
नागोठणे (शामकांत नेरपगार) -:
रायगडचे लोकप्रिय खासदार लोकनेते सुनिल तटकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धी संतोष कोळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी यांच्या पुढाकाराने पूरग्रस्त कुटुंबांना पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.
नागोठणे येथील सोन कोळीवाडा, कोळीवाडा, बंगल्याची आळी व मोहल्ला या पूरग्रस्त भागांतील प्रत्येक कुटुंबाला एक पाण्याचा जार देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूरानंतर निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
यावेळी वेलशेत येथील श्री जखमाता ॲक्वा सेंटरचे मालक मनोज ताडकर यांनी समृद्धी कोळी व संतोषभाई कोळी यांच्या छायाचित्राचे स्टिकर असलेले जार घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला २० लिटर शुद्ध पाणी सलग १० दिवस मोफत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली.
या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागाध्यक्ष संतोषभाई कोळी, पंचायत समिती सदस्या समृद्धीताई कोळी, अखलाक पानसरे, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत कोळी, अतुल काळे, मनोज टके, रोशन पारंगे, विजय पारंगे, अंकुश ताडकर, शाहिर पुंडलिक ताडकर, मनोज ताडकर, प्रमोद चोरगे, सम्राट ताडकर, श्याम पाटील, घनश्याम ताडकर, रयान सिराज पानसरे यांच्यासह महिला वर्ग व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

