नागोठणे पूरनियंत्रणासाठी मोठे निर्णय; अंबा नदी खोलीकरण, खासदार सुनिल तटकरे यांनी दिले व्यापाऱ्यांना व नागरिकांना तातडीच्या मदतीचे निर्देश
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – रोहा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या निर्देशानुसार आढावा बैठक पार पडली. बैठकीस खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासह जिल्हाधिकारी किसन जावळे, रजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले, रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवळ रजिप उपाध्यक्ष मधुकर पाटील, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, सदस्या समृद्धी कोळी,राष्ट्रवादी काँग्रेस रोहा ता. अध्यक्ष विनोद पाशिलकर, नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके,नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके आदी मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागाध्यक्ष किशोरभाई जैन यांनी नागोठणे परिसरातील पूरग्रस्त नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणींकडे खासदार सुनिल तटकरे यांचे लक्ष वेधले. तसेच पूरपरिस्थिती हाताळताना रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करून आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी व तत्परपणे राबविण्याची मागणी केली.
या बैठकीत नागोठणे शहर व परिसरातील पूरस्थितीवर विशेष चर्चा करण्यात आली. महाड येथील सावित्री नदीच्या धर्तीवर नागोठणे–कोलिटी दरम्यान अंबा नदीचे खोलीकरण करून गाळ काढणे व संरक्षण भिंती उभारणे, कानसई ते नागोठणे दरम्यान भूमिगत वीजवाहिन्या टाकणे तसेच वरवठणे येथील ऐतिहासिक जुन्या पुलाचे जतन करून नव्या पुलाच्या बांधकामाचा अंदाजपत्रक तयार करण्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी रजिपच्या बांधकाम विभागाला निर्देश दिले..
नागोठणे व परिसरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ ५० हजार रुपयांची मदत, तर घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित देण्याचे निर्देश कृषी विभागालाही देण्यात आले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पूररेषेच्या कारणास्तव कोणतीही अडचण न आणता नागोठण्यातील विमाधारक व्यापाऱ्यांचे दावे तत्काळ निकाली काढण्याचे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. राज्य व केंद्र शासनाकडून विकासकामे व नुकसानभरपाईसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीस रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. १९८९ च्या महापुराच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी नागोठणे व इतर पूरग्रस्त भागाला भेट देऊन स्वतः पाहणी करून शासकीय यंत्रणा कामाला लावली त्याच प्रमाणे २००५ व २०२२ पूरपरिस्थितीतील प्रशासनाच्या पूरपरिस्थितीत देखील प्रशासनाच्या कामकाजाचा उल्लेख करत याही वेळी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असा विश्वास खासदारा सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

