श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला
नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्था मर्या., नागोठणे या संस्थेचा २७ वा वार्षिक अहवाल (सन २०२५-२६) प्रसिद्ध करण्यात आला असून, संस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आराधना जैन हॉल, जैन मंदिरासमोर, बाजारपेठ, नागोठणे येथे आयोजित करण्यात आली असून संस्थेच्या सर्व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्था मर्या. नागोठणेचे सेक्रेटरी संजय काकडे यांनी केले आहे..
श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या कामकाजासह आर्थिक बाबी, लेखापरीक्षण अहवाल, अंदाजपत्रक, नफा वाटप, कर्जव्यवहार तसेच संस्थेच्या आगामी वाटचालीसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
सभेपुढे एकूण १४ विषय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२६ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालासह ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता देणे, सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर करणे तसेच सन २०२५-२६ च्या नफा वाटपास मंजुरी देणे या प्रमुख विषयांचा समावेश आहे.
तसेच संचालक मंडळातील सदस्य व त्यांच्या नातेवाईकांच्या कर्जव्यवहाराची माहिती सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षणातील दोष दुरुस्ती अहवाल, आगामी वर्षासाठी वैधानिक, अंतर्गत व कर लेखापरीक्षकांची नियुक्ती, कर्ज निर्लेखन प्रस्तावास मंजुरी तसेच सुधारित आदर्श उपविधीबाबतही सभेत चर्चा होणार आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्र वाढीबाबत, नवीन शाखा विस्ताराबाबत तसेच नवीन संस्था विलिनीकरणास मंजुरी देण्याच्या विषयावरही सभासदांमध्ये विचारविनिमय होणार आहे. याशिवाय पतसंस्थेचे अध्यक्ष किशोरभाई जैन यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
सभेच्या विशेष सूचनेनुसार, गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी व त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येणार असून, त्या सभेस गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही. सभेतील विषयांची माहिती सभासदांच्या माहितीसाठी संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती सेक्रेटरी संजय काकडे यांनी दिली आहे.

