आईच्या नावाने एक झाड लावा; पर्यावरण वाचवा — लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर
पळस येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
लायन्स क्लब नागोठणेच्या माध्यमातून आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, नागोठणे आणि पिएनपी माध्यमिक विद्यालय, पळस यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम सोमवारी (दि. २० जुलै) सकाळी ११.३० वाजता शैक्षणिक वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब नागोठणेचे अध्यक्ष विलास चौलकर होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विलास चौलकर म्हणाले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही संत तुकाराम महाराजांची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. झाडे ही आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहेत. निरोगी जीवनासाठी ऑक्सिजन आवश्यक असून तो मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून ती जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. आईची जशी सेवा करतो, तशीच झाडांचीही सेवा केली तर पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते.”
यावेळी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नागोठणे शाखेच्या व्यवस्थापिका पूर्वा वैद्य यांनी सांगितले की, संस्थेने रायगड जिल्ह्यात सहा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असून नागोठणे परिसरात आतापर्यंत ३२५ झाडांची लागवड करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी संस्थेचे कार्य सातत्याने सुरू असून लायन्स क्लबच्या समाजसेवेच्या उपक्रमात सहभागी होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर, उपाध्यक्ष एमजेएफ लायन सुधाकर जवके, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, लायन विजय शहासने, लायन संतोष शहासने, लायन सौ. अनुराधा विजय शहासने, आदर्श पतसंस्थेच्या नागोठणे शाखेच्या व्यवस्थापिका सौ. पूर्वा पराग वैद्य, सौ. आदिती रुपेश पाटील, नागोठणे केंद्र प्रमुख सुनील मोंढे, पिएनपी माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष गजानन भोईर, माजी अध्यक्ष गणपत डाकी, मुख्याध्यापक लक्ष्मण मोकल, शिक्षिका सायली ठाकूर, समीक्षा यादव, प्रेरणा शेळके यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रेरणा शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सायली ठाकूर यांनी मानले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी बाजारातील पुष्पगुच्छ न आणता झाडांच्या पानांपासून आकर्षक पुष्पगुच्छ स्वतः तयार केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर यांनी विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.

