महामार्ग अपूर्ण; तरी टोलनाका सुरू करण्याची घाई! नागरिकांचा संताप

महामार्ग अपूर्ण; तरी टोलनाका सुरू करण्याची घाई! नागरिकांचा संताप

वाकणनाका (सुनिल कोकळे) दि.४ एप्रिल

            मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा गेली दोन दशकांपासून अपूर्ण अवस्थेतच रखडलेला असताना खांब गावाजवळ टोलनाका सुरू करण्याची लगबग सुरू झाल्याचे चित्र समोर येत आहे. अपूर्ण कामे, धोकादायक वळणे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

           नुकताच सुकेळी खिंडीत झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

              दरम्यान, “मुंबई-गोवा महामार्ग अजून किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागोठणे, कोलाड, खांब, माणगाव ते महाड या दरम्यान आवश्यक असलेले उड्डाणपूल आणि इतर कामे अद्याप प्रलंबित आहेत. या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रशासनाने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

            अशा परिस्थितीत महामार्ग पूर्णत्वास न नेताच टोलनाका सुरू करण्याची घाई का केली जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यासोबतच स्थानिक नागरिकांना किती किलोमीटरपर्यंतच्या गावांना टोलमाफी मिळणार, याबाबतही स्पष्टता देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

             सदरील धिम्या गतीने सुरू असलेल्या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!