“मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ यांचे नाव द्यावे – धनगर समाजाची ठाम मागणी”
नागोठणे ( शामकांत नेरपगार )
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा – खंडाळा घाट परिसरातील महत्त्वाकांक्षी “मिसिंग लिंक मार्ग” प्रकल्पाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष पटकारे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याचे समजत असून, त्याआधीच या मार्गाचे नामकरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मिसिंग लिंक मार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, यामुळे मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे आणि वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकपरंपरा आणि जनश्रुतीनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्गदर्शन करून स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या स्मृतीचा सन्मान म्हणून या ऐतिहासिक प्रकल्पाला त्यांचे नाव देणे गरजेचे असल्याचे पटकारे यांनी नमूद केले आहे.
या नामकरणामुळे सामाजिक न्यायाला चालना मिळेल तसेच धनगर समाजाच्या अस्मितेला योग्य सन्मान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
धनगर समाजाकडून या निर्णयाची मोठ्या अपेक्षेने वाट पाहिली जात असून, सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

