आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या निर्देशानंतर नागोठण्यात स्वच्छता मोहीम; अग्निशामक दलाकडून बाजारपेठ व कोळीवाड्याची धुलाई
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) :– पूरग्रस्त नागोठण्याची गुरुवारी पाहणी करताना कोकण विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी परिसरात साचलेली घाण व दुर्गंधी पाहून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश रिलायन्स व सुप्रिम कंपनीला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी या निर्देशांचा पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी सकाळी दोन्ही कंपन्यांच्या अग्निशामक दलाने नागोठणे बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा तसेच नुक्कड गल्ली परिसरात पाण्याचा मारा करून सखोल स्वच्छता केली.
सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, जुगनशेठ जैन, शैलेश रावकर, सिराज पानसरे, पुनम काळे, मनोज टके, प्रथमेश काळे, अॅड. श्रीकांत रावकर, विजय शहासने, बिपीन सोष्टे, बंटी चोपडा, किरण काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

