सेवा देण्यातच समाधान; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लायन्स क्लब सदैव तत्पर
अध्यक्ष लायन विलास चौलकर यांचे प्रतिपादन; नागोठण्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था असून, समाजातील गरजू नागरिकांना मदत करण्यातच लायन्स सदस्यांना खरे समाधान मिळते. जुलै महिन्यात नागोठणे परिसरात आलेल्या पूरामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे प्रतिपादन नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विलास चौलकर यांनी केले.
नागोठणे येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान येथे सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पूरग्रस्तांसाठी मदत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंटरनॅशनल लायन्स क्लब फाउंडेशन यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना तूरडाळ १ किलो, मुगडाळ १ किलो, तेल १ किलो, साखर १ किलो, तांदूळ ५ किलो, बिस्कीट पाकीट, ४ ताटे, ४ वाट्या, २ भाजीचे मोठे चमचे, १ सतरंजी आणि १ चादर अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तसेच लायन्स क्लब सरगम पनवेल यांच्या वतीने महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
यावेळी पीएमजेएफ लायन अनिल म्हात्रे, लायन विलास चौलकर, एमजेएफ लायन प्रकाश जैन, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन विजय शहासने, लायन सुनील कुथे, लायन सखाराम ताडकर, लायन संतोष शहासने, लायन विशाल शिंदे, लायन सुजाता जवके, लायन विद्या म्हात्रे, लायन अनुराधा शहासने तसेच लायन्स क्लब सरगम पनवेलचे अध्यक्ष डॉ. आदित्य दोषी, डॉ. मानदा पंडित, लायन स्वाती गोडसे, लायन संध्या महानुभव यांच्यासह पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष लायन विलास चौलकर म्हणाले की, नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून गेल्या दोन महिन्यांत १३ सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले असून, याचा मला अभिमान आहे. ‘आम्ही सेवा देतो’ हे लायन्स क्लबचे ब्रीदवाक्य असून, सेवा करण्यात समाधान आणि आनंद मानणाऱ्या व्यक्तींनाच लायन्स क्लबचे सदस्य केले जाते, असे त्यांनी सांगितले.
पीएमजेएफ लायन अनिल म्हात्रे यांनी लायन्स क्लबच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, लायन्स क्लबचे जगभरात सुमारे १४ लाख ७० हजार सदस्य असून, ही जगातील अग्रगण्य सेवाभावी संस्था आहे. इंटरनॅशनल लायन्स क्लब फाउंडेशनच्या माध्यमातून नागोठण्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यात येत आहे. प्रत्येक लायन्स क्लबकडून दरवर्षी फाउंडेशनला देणगी दिली जाते. नैसर्गिक आपत्ती, शिक्षण तसेच विविध सामाजिक कार्यांसाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी पीएमजेएफ लायन अनिल गिते यांनी नागोठणे लायन्स क्लबने सीएसआरची नोंदणी करून घ्यावी, असा मौलिक सल्ला दिला. त्यामुळे परिसरातील विविध कंपन्यांकडून सामाजिक कार्यासाठी सीएसआर निधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लायन्स क्लबचा पुढाकार
नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांच्या मदतीसाठी लायन्स क्लबने पुढाकार घेतल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या या मदतीबद्दल नागरिकांकडून लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करण्यात आले.

