पेणचे कल्पेश ठाकूर ‘जीवनदूत’ पुरस्काराने सन्मानित
रायगड पोलिसांकडून जीवनदूतांच्या निःस्वार्थ कार्याचा गौरव
नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : मुंबई-गोवा महामार्गावर कुठेही अपघात घडला की, शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी जखमींच्या मदतीसाठी धावून जाणारे पेणचे कल्पेश ठाकूर हे खऱ्या अर्थाने ‘जीवनदूत’ ठरले आहेत. स्वतःचा तसेच सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढणे आणि त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करून जीव वाचविण्याचे कार्य ते गेल्या वीस वर्षांपासून निःस्वार्थपणे करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय समाजसेवेची दखल घेत रायगड पोलीस दलातर्फे ‘जीवनदूत पुरस्कार २०२६’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
रायगड पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत कुरूळ येथील आर.सी.एफ. सभागृहात ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगडचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते साई सहारा प्रतिष्ठान, पेणचे संस्थापक कल्पेश शरद ठाकूर यांच्यासह हेल्प फाउंडेशन, खोपोली, शेलार मामा रेस्क्यू टीम, माणगाव तसेच जिल्ह्यातील विविध मदतगार संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अलिबागच्या उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, रिलायन्स फाउंडेशनचे शशांक गोयल, रमेश धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रेस्क्यू संस्थांना शासनाकडून मदतीचे आश्वासन
पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले की, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रेस्क्यू संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा संस्थांना आवश्यक साहित्य व मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील इतर रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत अपघातांच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीतून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांना अधिकाधिक सहकार्य करावे. युवकांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसेच दारू पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहनही गोगावले यांनी केले.
‘जीवनदूत हे खरे देवदूत’
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जीवनदूतांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, जीवनदूतांचा सन्मान हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. रायगड हा विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जाणारा जिल्हा आहे. अशा संकटांच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविणारे जीवनदूत हे खरे देवदूत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही जावळे यांनी सांगितले.
जनजागृतीमुळे अपघातांचे प्रमाण घटले
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत सातत्याने जनजागृती केल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून अपघातातील मृत्यूंची संख्याही घटली आहे. मात्र अपघात आणि नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे टाळता येत नाहीत. अशा वेळी जीवनदूत आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय रायगड पोलीस दलाने घेतला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आभार प्रदर्शन केले.
वीस वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी धाव
कल्पेश ठाकूर हे मागील वीस वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांना विनामूल्य मदत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले असून अनेक जखमींना स्वतःच्या खर्चाने उपचारासाठी पेण, अलिबाग, पनवेल आणि मुंबई येथील रुग्णालयांत दाखल केले आहे.
आपत्तीच्या प्रसंगी मदतीसाठी तत्पर राहून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वीही विविध शासकीय व सामाजिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आता रायगड पोलीस दलाच्या वतीने ‘जीवनदूत पुरस्कार २०२६’ देऊन त्यांच्या निःस्वार्थ सेवेला आणखी एक मानाचा मुजरा करण्यात आला आहे.

