४२ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षिका; वरवठणे जि.प. शाळेचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात!

४२ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षिका; वरवठणे जि.प. शाळेचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात!

पालकवर्ग संतप्त; ५ सप्टेंबरची प्रतीक्षा न करता तातडीने कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी

नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे जवळील वरवठणे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तब्बल ४२ विद्यार्थी शिक्षण घेत असताना संपूर्ण शाळेची जबाबदारी केवळ एका शिक्षिकेवर असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून, शाळेला किमान आणखी एक कायमस्वरूपी शिक्षक तातडीने द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

       • पालकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी •

मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वरवठणे येथील जिल्हा परिषद शाळेत पालकवर्ग एकत्र आला. यावेळी पालकांनी शाळेतील शिक्षकांची कमतरता पत्रकारांच्या निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी वरवठणेचे माजी सरपंच गणपतशेठ म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान राणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, प्रणिता म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

   • गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव •

दरम्यान, वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत लक्ष्मण म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, उपाध्यक्षा प्रणिता म्हात्रे, लतिका शेडगे व निकिता वारगे यांनी रोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अतुल जगताप यांची भेट घेतली. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने आणखी एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

मात्र, शिक्षकांची कमतरता असल्याचे सांगत गटशिक्षणाधिकारी अतुल जगताप यांनी येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक भरती झाल्यानंतर वरवठणे शाळेला आणखी एक शिक्षक देण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पालकवर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

      • महिनाभरापूर्वीही मांडली होती समस्या •

विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष संतोष बैकर यांनी तत्कालीन रोहा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांची भेट घेऊन शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न मांडला होता. मात्र, त्यावेळीही समाधानकारक निर्णय न झाल्याने पालकांची निराशा झाली होती.

‘मग पालकांनी जिल्हा परिषद शाळेत पाल्यांना का पाठवावे?’

एकीकडे रायगड जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे, असे आवाहन विविध स्तरांतून केले जाते. मात्र, ४२ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षिका अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल का करावे, असा सवाल उपस्थित होत आहे.

      • ५ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा नको! •

४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी एका शिक्षिकेवर असणे ही बाब गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने गंभीर असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक भरतीची प्रतीक्षा न करता वरवठणे जिल्हा परिषद शाळेला तातडीने आणखी एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी पालकवर्गातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!