नागोठण्यात ५ सप्टेंबरला भव्य दहीहंडी सोहळा! विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस; १६व्या वर्षी उत्सवाची रंगत वाढणार

 नागोठण्यात ५ सप्टेंबरला भव्य दहीहंडी सोहळा!

 विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस; १६व्या वर्षी उत्सवाची रंगत वाढणार

नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : श्री किशोरभाई जैन मित्रमंडळाच्या वतीने आयोजित १६वा भव्य दहीहंडी उत्सव शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी नागोठणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नागोठणे विभागापुरता मर्यादित असलेल्या या उत्सवात गोविंदा पथकांच्या थरारक सलामीसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

 • सकाळी ११ वाजता दहीहंडी पूजन

दहीहंडी पूजनाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत गोविंदा पथकांच्या सलामीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गोविंदा पथकांकडून ५ थरांची सलामी देण्यात येणार आहे.

सलामी देणाऱ्या प्रत्येक ग्रुपला २ हजार ५२५ रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

• सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रंगत •

दुपारी २ ते रात्री ८ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागोठणे विभागातील जास्तीत जास्त तरुणांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानचिन्ह व बक्षीस देण्यात येणार आहे.

🏆 विजेत्या गोविंदा पथकाला ५५,५५५ रुपयांचे बक्षीस!

दहीहंडी उत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला अंतिम सोहळा रात्री ८ वाजता होणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल ५५ हजार ५५५ रुपये रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

 • पत्रकार परिषदेत उत्सवाची माहिती•

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री किशोरभाई जैन मित्रमंडळ दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांच्या नागोठणे येथील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना उत्सवाचे नियोजन व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेला अध्यक्ष ॲड. रमेश जाधव, कार्यवाहक धनंजय जगताप, जितेंद्र जाधव यांच्यासह श्री किशोरभाई जैन मित्रमंडळ दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 नागोठणेकरांसाठी उत्सव ठरणार विशेष आकर्षण

तरुणाईचा उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणि गोविंदा पथकांच्या थरारक सलामीचा जल्लोष यामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा नागोठणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!