संघर्षातून घडवले यशाचे शिखर : निकिता मोरे यांच्या जिद्दीला सलाम; चि. मितेश व चि. सौ. का. आसावरी यांचा साखरपुडा उत्साहात संपन्न
नागोठणे (शामकांत नेरपगार) -: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपभाई टके यांची आतेबहीण तथा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील नाभिक समाजातील कर्तृत्ववान महिला शेतकरी श्रीमती निकिता उर्फ बेबीताई सुधाकर मोरे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला बुधवारी दि. २४ जून २०२६ रोजी एक आनंददायी व अभिमानास्पद वळण मिळाले. त्यांचे सुपुत्र चि. मितेश सुधाकर मोरे याचा साखरपुडा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोठीजुई येथील सलून व्यावसायिक महेंद्र खराटे व सौ. योगिता खराटे यांची सुशील व गुणी कन्या चि. सौ. का. आसावरी हिच्याशी अतिशय कौटुंबिक व पारिवारिक वातावरणात संपन्न झाला.
काही वर्षांपूर्वी पती स्व. सुधाकर मोरे यांच्या आकस्मिक निधनामुळे निकिता मोरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्या वेळी त्यांच्या दोन मुलींची लग्ने झाली असली तरी दोन मुली व मुलगा मितेश यांचे शिक्षण सुरू होते. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता त्यांनी शेती व सलून व्यवसायाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. अपार मेहनत, जिद्द आणि मुली व जावयांच्या सहकार्याच्या बळावर त्यांनी आपल्या सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले तसेच दोन्ही मुलींना सुस्थितीत विवाहबद्ध करून आपले कर्तव्य पार पाडले.
चि. मितेश मोरे यांने आईला शेतीच्या कामात मदत करत बी.एस्सी. (केमिस्ट्री) पर्यंत शिक्षण पूर्ण केले. विज्ञान शाखेची पदवी मिळूनही नोकरीच्या मागे न लागता चि. मितेश याने आपल्या वडिलांचा पारंपरिक सलून व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथे सलून व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्याने या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे येथे असलेल्या त्याच्या सलूनने ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला असून दूरदूरवरून ग्राहक त्यांच्या सेवेसाठी येत असतात.
आपल्या मेहनतीने व व्यावसायिक कौशल्याने चि. मितेश मोरे याने नाभिक समाजातील सुशिक्षित तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. चि. मितेश व चि. सौ. का. आसावरी यांचा साखरपुडा समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपभाई टके यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चि. मितेश व चि. सौ. का. आसावरी यांना शुभआशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

