वाढदिवसाला समाजसेवेची जोड; नरेश कोकरे यांचा सामाजिक उपक्रमांतून अनोखा वाढदिवस!
बेलवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्नेहभोजन; फणसाडी शाळेत दप्तरांचे वाटप, कारीवणेत वृक्षारोपण
वाकणनाका (सुनिल कोकळे) : आजकाल वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि शुभेच्छांचा वर्षाव असे चित्र पाहायला मिळते; मात्र रोहा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष व समाज सेवेचे व्रत जपणारे नरेश सुरेश कोकरे यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत समाजोपयोगी उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला.
दरम्यान नरेश कोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या-पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच अतिदुर्गम फणसाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.

त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कारीवणे येथे विविध फळझाडे व फुलझाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

“वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी रोहा तालुका भाजप अध्यक्ष अमित दादा घाग, तालुका सरचिटणीस कृष्णाजी बामणे, डेटा विभाग अध्यक्ष सचिन मोरे यांच्यासह जयंत कोकरे, धर्मा कोकरे,आशिष कांजीकर, राज शिरसागर, लक्ष्मण कोकरे, सखाराम गोरे, लोकेश लोभी, नथुराम हंबीर, शिरीष देशमुख, स्वप्निल कोकरे, नितेश गोरे, योगेश गोरे, बबन गोरे, मनीषा लांबोरे, खेळू कोकरे, संजय कोकरे तसेच फणसाडी शाळेचे शिक्षक राठोड सर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील वाढदिवसाचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबवत यशस्वीरीत्या पार पडला.

