दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेससह हॉलिडे स्पेशल गाड्यांना नागोठण्यात थांबा मिळणार
खासदार सुनील तटकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद; रेल्वे प्रशासनाला तात्काळ पत्र पाठविण्याचे आदेश
नागोठणे (शामकांत नेरपगार) : नागोठणे रेल्वे स्थानकात दिवा–सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेस तसेच हॉलिडे स्पेशल मेल / एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी नागोठणे प्रवासी संघटनेच्या वतीने रायगड–रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना सुतारवाडी (रोहा) येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले. या मागणीला खासदार तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, नागोठणे प्रवासी संघटनेचे सल्लागार ॲड. महेश पवार, अध्यक्ष हृषीकेश भोय, सचिव संदेश सुकाळे, सामाजिक कार्यकर्ते बंटी मांडे, बबलू खंडागळे, विजय शहासने, पप्पूशेठ जैन यांच्यासह प्रवासी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
नागोठणे हे शिवकालीन वारसा लाभलेले तसेच भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागोठणे परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध असून रिलायन्स पूर्वीची आयपीसीएल, जिंदाल ग्रुपची महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड, विभोर स्टील ट्यूब, सुप्रीम पेट्रोकेमिकल, जेएसडब्लू स्टील यांसारखे मोठे उद्योग या परिसरात आहेत.
नागोठणे परिसरासह पेण तालुक्यातील काही भाग, रोहा तालुक्यातील काही भाग आणि संपूर्ण सुधागड तालुक्यातील सुमारे १२६ गावांतील नागरिकांसाठी नागोठणे रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. तसेच नागोठणे हे शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात भिस्त आहे.
मात्र नागोठणे स्थानकावर सध्या मर्यादित रेल्वेगाड्यांना थांबा असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाडी क्रमांक १०१०५–१०१०६ दिवा–सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसला कोरोना पूर्वी नागोठणे स्थानकावर नियमित थांबा होता. या गाडीने मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्रवासी अप-डाऊन प्रवास करीत होते. मात्र कोरोना काळानंतर या गाडीचा नागोठणे येथील थांबा अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे गाडी क्रमांक १०१०५–१०१०६ दिवा–सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसचा नागोठणे स्थानकावरील पूर्वीचा थांबा पुन्हा सुरू करण्यात यावा, तसेच हॉलिडे स्पेशल मेल/एक्स्प्रेस गाड्यांना नागोठणे येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याशिवाय १२६१९–१२६२० लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर सेंट्रल–लोकमान्य टिळक टर्मिनस, तसेच १२६१७–१२६१८ एर्नाकुलम जंक्शन–हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम जंक्शन आदी महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही नागोठणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
नागोठणे प्रवासी संघटनेच्या या मागणीवर खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत, दिवा–सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेस तसेच हॉलिडे स्पेशल मेल /
एक्स्प्रेसला गाड्यांना नागोठणे स्थानकात थांबा मिळवून देण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच याबाबत दिल्ली येथील रेल्वेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पत्र पाठविण्याचे आदेश आपल्या स्वीय सहाय्यकांना दिले.
खासदार सुनिल तटकरे यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे नागोठणे परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

