तांबडी खुर्द येथील स्मशानभूमी शेड जमीनदोस्त झाल्याची तक्रार; ठेकेदाराकडून पुन्हा कामाला सुरुवात, मनोहर गोरे यांच्या पाठपुराव्याला यश
वाकणनाका (सुनिल कोकळे) : रोहा तालुक्यातील तांबडी खुर्द येथे शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमी शेडचे बांधकाम जमीनदोस्त झाल्याची तक्रार शिवसेना बांधकाम कामगार सेना, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर विठ्ठल गोरे यांनी प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित ठेकेदाराकडून सदर शेडच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मनोहर गोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
तांबडी खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या निधीतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र, सदर शेड जमीनदोस्त झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याबाबत मनोहर गोरे यांनी पंचायत समिती रोहा येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून संबंधित कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली होती.
सदर कामामध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाला आहे का, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, तसेच कामाचे बिल, मोजमाप पुस्तिका (Measurement Book) व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
तक्रारीनंतर प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून स्मशानभूमी शेडच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, मनोहर गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
शासनाच्या निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने व्हावीत, यासाठी यापुढेही अशा कामांवर लक्ष ठेवणार असल्याचे मनोहर गोरे यांनी सांगितले.


