भारतीय एज्युकेशन सोसायटी म्हणजे नोकरी’ अशी ओळख रायगडभर निर्माण होईल : किशोरभाई जैन कौशल्याच्या जोरावर रोजगार मिळवा : वैकुंठशेठ पाटील

भारतीय एज्युकेशन सोसायटी म्हणजे नोकरी’ अशी ओळख रायगडभर निर्माण होईल : किशोरभाई जैन

कौशल्याच्या जोरावर रोजगार मिळवा : वैकुंठशेठ पाटील

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि भारतीय एज्युकेशन सोशल चॅरिटेबल ट्रस्ट, वेलशेत-नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे आयोजन सोमवार, दि. 29 सप्टेंबर रोजी भारतीय एज्युकेशन संस्थेच्या संकुलात करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात रोहा तालुक्यातील 16 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला, तर रोजगाराच्या संधीच्या शोधात विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या संधींचा लाभ रायगडमधील तरुणांनी घेतला पाहिजे. ‘आजपासून भारतीय एज्युकेशन सोसायटी म्हणजे नोकरी’ अशी जाणीव संपूर्ण रायगड जिल्ह्याला होईल, असा विश्वास भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.

                 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास विभागाचे मंत्री अॅड. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याच कार्यक्रमात भारतीय एज्युकेशन संस्थेतील मान्यवर व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील रोजगार मेळाव्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

                  यावेळी भारतीय एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील, सभापती वैकुंठशेठ पाटील, सदस्य चंद्रकांत वारगुडा, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी उदयकुमार सूर्यवंशी, नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी पंचायत समिती सदस्य संजय भोसले, भाएसोचे सीईओ कार्तिक जैन, भाई शिर्के, जिल्हा रोजगार विभागाचे अधिकारी महेश वाखरे, नागोठणे आयटीआयचे गट निर्देशक व कार्यक्रम समन्वयक प्रविण कांबळे, भाएसोचे सुरेश जैन, रजिस्ट्रार वैभव नांदगावकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आशिष पगारिया यांच्यासह विविध कंपन्यांचे अधिकारी, विद्यार्थी व रोजगारासाठी आलेले युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                यावेळी मार्गदर्शन करताना किशोरभाई जैन म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मानवतेची भावना ठेवून मेळाव्यात सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. शासनाने या मेळाव्यासाठी चांगली व्यवस्था केली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

               रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित होत असून विविध मोठे प्रकल्प जिल्ह्यात येत आहेत. या संधींचा लाभ रायगडमधील तरुणांनी घेतला पाहिजे. ‘आजपासून भारतीय एज्युकेशन सोसायटी म्हणजे नोकरी’ अशी जाणीव संपूर्ण रायगड जिल्ह्याला होईल, असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.

              जिल्हा परिषद सभापती वैकुंठशेठ पाटील यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाचनपूर्ती कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानास सुरवात झाली असून नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वर्ष देश सेवा केलेली आहे त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी फार मोठे धाडसी निर्णय घेतले आहे. त्यांचा 370 कलम लावला हा मोठा निर्णय आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश जगातील तिसरा आर्थिक महासत्ता देश म्हणून उदयास येत आहे.

                पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी रायगड जिल्ह्याला अटल सेतू मार्ग व विमानतळ देऊन आपल्यावर उपकार केलेले आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असून रिलायन्स, जएसडब्लू अशा मोठया कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत परंतु कौशल्य महत्वाचे आहे त्याचा लाभ सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली असून युवकांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. रायगड जिल्ह्यात रिलायन्स, जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र त्यासाठी कौशल्याला विशेष महत्त्व आहे. युवकांनी आपल्या कौशल्याचा विकास करून या संधींचा लाभ घ्यावा. रोजगार मेळावा हा बेरोजगार युवकांसाठी नवसंजीवनी ठरत असून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे. तरुणांनी या संधींचा लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय एज्युकेशन संस्थेच्या भव्य शैक्षणिक संकुलाची उभारणी केल्याबद्दल किशोरभाई जैन यांचे वैकुंठशेठ पाटील यांनी कौतुक केले.

                  जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांनीही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व कौशल्य पाहून जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, असे आवाहन केले.
रोहा तालुक्यातील 16 कंपन्यांच्या सहभागामुळे रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!