शेतकरी सन्मान पुरस्काराने प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव; नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
सेंद्रिय शेती व कृषी पर्यटनाचा स्वीकार काळाची गरज – सपोनि रविंद्र पारखे
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील शेतीनिष्ठ प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेतावर जाऊन करण्यात येतो. त्याच परंपरेला पुढे नेत रायगड प्रेस क्लब संलग्न नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने ‘शेतकरी सन्मान पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा शुक्रवार (दि. २४) रोजी सकाळी ११ वाजता नागोठणे जवळील ऐनघर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी महादेव गणपत मोहिते ( ऐनघर, ता. रोहा) तसेच युवा प्रगतशील शेतकरी मनिष उमाकांत जांबेकर ( आमडोशी, ता. रोहा) यांना मान्यवरांच्या हस्ते शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपभाई टके, नागोठणे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे, रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, ऐनघर ग्रामपंचायत अधिकारी गोविंद शिद, ऐनघरच्या सरपंच कलावती कोकळे, माजी उपसरपंच मनोहर सुटे, भगवान शिद, जितेंद्र धामणसे, जानू वारगुडा, उमाकांत जांबेकर, किरण शिरसे, उपकृषी अधिकारी संजय शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रफुल्ल कदम व मिलिंद पवार, नागोठणे मंडळ अधिकारी सुवर्णा कोकळे, ऐनघरचे तलाठी योगेश वार्डे, पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, राजेश पिंपळे, वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश पवार यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना नागोठणे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी विषयात एम.एस्सी. पदवी प्राप्त असलेल्या पारखे यांनी सांगितले की, बेभरवशाच्या पावसामुळे मला शेती करता आली नाही आणि त्यामुळे नोकरी स्वीकारावी लागली. मात्र रायगड जिल्ह्यात शेतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गांडूळ खताचा वापर करून नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे. महादेव मोहिते व मनिष जांबेकर हे गांडूळ खताची निर्मिती करून शेतीसोबतच खताचा व्यवसाय यशस्वीपणे करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या उपक्रमाचेही त्यांनी अभिनंदन केले.
रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे काही काळ शेतकरी शेतीपासून दूर गेले होते. मात्र आता पुन्हा शेतीकडे वळत असून रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचे चार पुरस्कार मिळाले, ही अभिमानाची बाब आहे. रायगडला लाभलेल्या निसर्गसंपदेचा उपयोग करून कृषी पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. पत्रकार असोसिएशनने पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य असून इतर शेतकऱ्यांनीही अशाच आदर्श शेतीचा अवलंब करावा.
पुरस्कारप्राप्त शेतकरी महादेव मोहिते यांनी सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताचे महत्त्व विशद केले. तर युवा शेतकरी मनिष जांबेकर यांनी दर्जेदार गांडूळ खत निर्मितीमुळे त्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी असल्याचे सांगितले. तरुणांनी शेतीपूरक उद्योग सुरू केल्यास नोकरीची गरज भासणार नाही. केमिकलमुक्त भाजीपाला उत्पादन करणारा रोहा तालुका आणि सेंद्रिय शेतीसाठी ओळखला जाणारा रायगड जिल्हा निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करून शेती क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

