रायगडच्या श्रेयाताई केदार-कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याकडून अभिनंदन; संघटन अधिक बळकट करण्याचा व्यक्त केला विश्वास

रायगडच्या श्रेयाताई केदार-कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती
प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याकडून अभिनंदन; संघटन अधिक बळकट करण्याचा व्यक्त केला विश्वास

नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा शुक्रवार (दि. २४) रोजी करण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील महिला नेत्या श्रेयाताई केदार-कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
           प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रसिद्ध केलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, प्रत्येक पद हे केवळ सन्मानाचे नसून जनसेवा, संघटन आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपण्याची मोठी जबाबदारी घेऊन येते. रायगडच्या श्रेयाताई केदार-कुंटे या ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना व उपक्रम तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य श्रेयाताई केदार-कुंटे करतील, असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
          रायगड जिल्ह्यातील महिला नेतृत्वाला मिळालेल्या या महत्त्वपूर्ण संधीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून श्रेयाताई केदार-कुंटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात महिला मोर्चाचे संघटन अधिक सक्षम व प्रभावी होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!