नागोठणेसाठी स्वतंत्र वीज फीडरची मागणी; खासदार सुनील तटकरे यांच्याकडे समृद्धी कोळी यांचे निवेदन
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) :
नागोठणे व परिसरातील नागरिकांना वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच तांत्रिक बिघाडानंतर वीजपुरवठा सुरळीत होण्यास होणारा विलंब या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रोहा पंचायत समिती सदस्या सौ. समृद्धी संतोष कोळी यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग नेते दिलीपभाई टके, पंचायत समिती सदस्या समृद्धी कोळी, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, रोहा ता. उपाध्यक्ष रोशन पारंगे, नागोठणे माजी उपसरपंच सुरेश जैन, बिपीन सोष्टे, अंकुश ताडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या निवेदनात नागोठणे परिसरात झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण, नवीन उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि वाढती लोकसंख्या यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, लघुउद्योग, शासकीय कार्यालये तसेच पाणीपुरवठा योजनांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे येथे नवीन विद्युत सबस्टेशन उभारण्यात येत असून या सबस्टेशनमधून नागोठणे विभागासाठी स्वतंत्र वीज फीडर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, अखंडित व विश्वासार्ह होण्यास मदत होईल. तसेच वारंवार होणारे वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होतील, तांत्रिक बिघाडाच्या वेळी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होईल आणि नागरिकांसह उद्योगांनाही मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित शासकीय विभाग यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करून नागोठणे विभागासाठी स्वतंत्र वीज फीडर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा, अशी विनंतीही खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सौ. समृद्धी संतोष कोळी यांनी केली आहे.

