श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न इस्कॉन नागोठणेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी भव्य धार्मिक सोहळा

श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
इस्कॉन नागोठणेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी भव्य धार्मिक सोहळा

नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) नागोठणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव २०२६’ हा भव्य धार्मिक व आध्यात्मिक सोहळा रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी आराधना भवन, नागोठणे येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास नागोठणे व परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव २०२६’ निमित्त इस्कॉन परिवाराच्या वतीने भाजप व्यापारी सेल (बिझनेस विंग) रायगड जिल्हाध्यक्ष सचिन मोदी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हिस ग्रेस कृष्ण गोविंद प्रभू यांनी भेटवस्तू देऊन सचिन मोदी यांचा गौरव केला.

              कार्यक्रमाची सुरुवात नगर संकीर्तनाने झाली. त्यानंतर अभिषेक दर्शन, भक्तिगीते, नृत्य, श्रीकृष्ण कथा व आध्यात्मिक प्रवचन, ५६ भोग अर्पण तसेच महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिगीते व श्रीकृष्णाच्या जयघोषाने आराधना भवन परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

              या सोहळ्यास इस्कॉन चौपाटी, मुंबई येथील कथाकार हिस ग्रेस कृष्ण गौर प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी श्रीकृष्णभक्ती, अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व याविषयी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. विविध मान्यवरांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

            श्रीकृष्णभक्तीचा प्रसार, आध्यात्मिक संस्कारांची जोपासना आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इस्कॉन नागोठणेच्या वतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन नागोठणेचे प्रमुख महाप्रभू निताई दास तसेच सर्व सेवेकरी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!