श्री जोगेश्वरी माता चैत्र पालखी सोहळा १२ तासांतच पूर्ण व्हावा!
धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन निर्णय घेण्याचे आवाहन; नवरात्रोत्सवाच्या नियोजन बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज नवरात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात तसेच चैत्र पालखी सोहळ्याचा जमा-खर्च तपशील श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त समिती व ग्रामस्थांसमोर सादर करण्यासाठी श्री जोगेश्वरी देवस्थान उत्सव समितीच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज मंदिरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीस देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव दिलीपभाई टके, विश्वस्त जयराम पवार, अशोक गुरव, देवस्थानचे मानकरी राजेश पोवळे, उत्सव समितीचे माजी सचिव विलास चौलकर, खडकआळी ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख विठ्ठल खंडागळे, खडकआळी गाव पाटील राजेंद्र जोशी, देवस्थानचे व्यवस्थापक संजय राजीवले, ग्रामस्थ किसन भोय, बबलू खंडागळे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, खजिनदार सतीश पाटील, सहसचिव अनिल पवार यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत देवस्थानचे मानकरी राजेश पोवळे यांनी चैत्र पालखी सोहळ्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडली. श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचा पालखी सोहळा सध्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ चालतो. मात्र, ही प्रथा योग्य नसून पालखी सोहळ्याची सांगता १२ तासांच्या आत झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पालखी सोहळ्याचे धार्मिक महत्त्व हे एका दिवसाचे असून देवीचे पावित्र्य जपणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. श्री जोगेश्वरी मातेची सर्वांवर कृपा व आशीर्वाद आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्याबाबतच्या सर्व बाबींवर ग्रामस्थ तसेच महिला वर्गाने एकत्रित येऊन विचारविनिमय करणे आवश्यक आहे, असे आवाहन राजेश पोवळे यांनी केले.
देवस्थान उत्सव समितीचे माजी सचिव विलास चौलकर यांनी राजेश पोवळे यांच्या भूमिकेला सहमती दर्शवित ग्रामस्थांनी ठोस निर्णय घेऊन चैत्र पालखी सोहळ्याची सांगता १२ तासांतच झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. ग्रामस्थ रोहिदास हातनोलकर यांनी देवस्थान विश्वस्त समितीमधील रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी सूचना केली. यावर अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी यासंदर्भात काही अडचणी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या अडचणी लवकरच दूर करून निस्वार्थी व निष्पक्ष पद्धतीने योग्य व्यक्तींची नवीन विश्वस्त म्हणून निवड करण्यात येईल, असे सांगून अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी नवरात्रौस्तवा संधर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल उर्फ तात्या खंडागळे यांनी उत्सव समितीने अनाठायी खर्च कमी करून उत्सवाच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, अशी सूचना केली. यावर उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांचे उत्सव समितीकडून तंतोतंत पालन केले जाईल तसेच खर्चावर योग्य नियंत्रण ठेवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत यावर्षीच्या चैत्र पालखी सोहळ्याचा जमा-खर्चाचा तपशील उत्सव समितीचे सचिव विवेक देशपांडे यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखविला. या जमा-खर्चास उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मान्यता दिली. श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज पालखी सोहळ्याची धार्मिक परंपरा, पावित्र्य व शिस्त कायम राखण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. पालखी सोहळा हा श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय असल्याने त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

