तसव्वूर उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांची नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

तसव्वूर उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांची नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तसव्वूर अब्दुल वहाब अधिकारी उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मितेश कल्याणी यांनी दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती केली.

               रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष अशपाकभाई पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख आणि जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाशजी कुशवाहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

 नागोठणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करणे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, संघटनात्मक उपक्रम राबविणे तसेच नागोठणे शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करण्याची जबाबदारी पप्पूशेठ अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तसव्वूर उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पप्पूशेठ अधिकारी हे उच्चशिक्षित असून त्यांचा सर्वांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच ते गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदत करीत असतात, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पप्पूशेठ अधिकारी म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून नागोठणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्न करणार असून नागोठणे शहरातील तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.

रोहा येथील हॉटेल मिराज येथे झालेल्या कार्यक्रमात रोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मितेश कल्याणी यांच्या हस्ते तसव्वूर उर्फ पप्पूशेठ अधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे, जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार, सुनील देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाशजी कुशवाहा, अॅड. सुनील सानप, रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य बिलाल कुरेशी, आसिफ मुल्ला यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!