नागोठणे पोलीस स्टेशनच्या बाप्पाला पोलिसांनी नाचत-गाजत दिला भावपूर्ण निरोप महिला पोलिसांच्या उत्स्फूर्त नृत्याने विसर्जन मिरवणुकीत रंगत; डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांचाही सहभाग

नागोठणे पोलीस स्टेशनच्या बाप्पाला पोलिसांनी नाचत-गाजत दिला भावपूर्ण निरोप

महिला पोलिसांच्या उत्स्फूर्त नृत्याने विसर्जन मिरवणुकीत रंगत; डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांचाही सहभाग

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : पोलीस बॉईज संघटना, नागोठणे यांच्यावतीने विराजमान करण्यात आलेल्या लाडक्या गणरायाची नागोठणे पोलिसांकडून गेल्या ११ दिवसांपासून भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी रात्री नागोठणे पोलीस स्टेशनच्या गणरायाला पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार आणि पत्रकारांनी नाचत-गाजत भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत रोहा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मिरवणुकीचा आनंद घेत पोलिसांसोबत नृत्याचा ठेका धरला.

  या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्दीऐवजी पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ते, तर महिला पोलिसांनी पारंपरिक साड्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अगदी मिसळून गेले होते. विशेषतः महिला पोलिसांनी केलेल्या उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागोठणे पोलीस स्टेशन येथून गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली. यावेळी पुरुष व महिला पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी तसेच पत्रकारांनीही उत्साहाने नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला. पोलीस स्टेशनपासून बाजारपेठ मार्गे मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनीही मिरवणुकीत सहभागी होत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

 ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत ही मिरवणूक नागोठणे येथील अंबा नदीच्या विसर्जन घाटावर पोहोचली. तेथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणरायाची आरती करून भावपूर्ण वातावरणात पूजा केली. त्यानंतर पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे व नागोठणे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अंबा नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले.

यावेळी पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, महिला पोलिस कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात नाचत-गाजत दिलेला हा निरोप नागोठणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!