पारदर्शक कारभार, कर्मचारी वर्गाची मेहनत अन् एकीच्या बळावर श्री अष्टविनायकची यशस्वी वाटचाल – अध्यक्ष विलास चौलकर
१२ लाख ७६ हजारांचा नफा; सभासदांना ९ टक्के लाभांश — अध्यक्ष विलास चौलकर यांची घोषणा
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) – नागोठणे ता. रोहा जि. रायगड येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागोठणेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी सायं. ५ वाजता श्री आराधना भवन, जैन मंदिरासमोर, नागोठणे येथे संस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष विलास चौलकर यांनी संस्थेचा ९ टक्के लाभांश जाहीर करताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला.
सभेसाठी अध्यक्ष विलास चौलकर यांच्या समवेत प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई, सपोनि रविंद्र पारखे, रजिपचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, नागोठणे सह भातगिरणी संस्थेचे सभापती सदानंद गायकर आदी मान्यवरांसह पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयराम पवार, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव प्रफुल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे, व्यवस्थापिका शैला घासे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक रोहिदास हातनोलकर यांनी उत्कृष्टपणे करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी बोलताना अध्यक्ष विलास चौलकर म्हणाले की, नागोठण्यातील तज्ञ लोकांसमोर पतसंस्था चालविणे हे जिकिरीचे काम आहे. मात्र संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि कर्मचारी वर्गाची मेहनत यामुळे श्री अष्टविनायक पतसंस्था यशस्वी वाटचाल करीत आहे. ‘एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या सहकार क्षेत्रातील तत्त्वानुसार संस्थेचे कामकाज सुरू आहे.”

गरजू लोकांना कर्ज देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम श्री अष्टविनायक पतसंस्था करीत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगून विलास चौलकर म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळविणे अनेकदा अवघड असते. मात्र श्री अष्टविनायक पतसंस्था एका दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण रोहा तालुक्यात कार्यरत असलेली ही पतसंस्था पैशांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण वंचित राहू नये तसेच मुलांची लग्ने अडून राहू नयेत, यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड काळात श्री अष्टविनायक पतसंस्थेने महाराष्ट्र शासनाला २५ हजार रुपयांची देणगी दिली असून, महापुराच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य केले आहे. ही पतसंस्था गरीब व गरजू लोकांची असून, एकीच्या बळावर संस्थेने नावलौकिक मिळविला आहे, असे अध्यक्ष चौलकर यांनी स्पष्ट केले.
संस्थेत एखादी जटिल समस्या निर्माण झाल्यास सर्व संचालक मंडळ एकत्र येऊन विचारविनिमयातून त्यावर तोडगा काढते. संस्थेचा ऑडिट वर्ग सातत्याने ‘अ’ दर्जाचा राहिला असून, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पतसंस्थेची उलाढाल सुमारे १५ कोटी रुपयांच्या घरात असून, यावर्षी संस्थेला १२ लाख ७६ हजार रुपयांचा नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष विलास चौलकर यांनी केली.
प्रमुख पाहुणे भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी श्री अष्टविनायक पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, सहकार क्षेत्रातील अनेक पतसंस्था सुरू झाल्या; मात्र त्या टिकल्या नाहीत. पतसंस्थेची तुलना दहीहंडीशी करताना त्यांनी सांगितले की, दहीहंडीप्रमाणे पतसंस्थेमध्ये एखाद्या संचालकाची जरी चलबिचल झाली, तरी संस्था विस्कळीत होऊ शकते. मात्र श्री अष्टविनायक पतसंस्था गेली २७ वर्षे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, हे सोपे काम नसल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष विलास चौलकर व संचालक मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे प्रकाशभाऊ देसाई यांनी सांगितले.
यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे तसेच रजिपचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पतसंस्थेच्या वार्षिक सभेचे औचित्य साधून वैमानिकाचे यशस्वी शिक्षण पूर्ण केल्याबद्दल अथर्व प्रकाश चौलकर यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कर्तृत्व गाजविलेल्या मान्यवरांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

