नागोठण्यात श्री अष्टविनायक पतसंस्थेची शनिवारी २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
भाजप नेते प्रकाशभाऊ देसाईंसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती; गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा होणार सत्कार
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या रोहा तालुक्यातील नागोठणे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४ वाजता श्री आराधना भवन, जैन मंदिरासमोर, नागोठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष विलास मारुती चोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे सर्व सभासद तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रफुल नागोठणेकर यांनी केले आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
सभेस प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे, रजिपचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सत्यनारायण महापूजेचे आयोजन
वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून पतसंस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महापूजेचा तीर्थप्रसाद सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार असून सभासद, हितचिंतक व नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा सत्कार
दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कर्तृत्व गाजविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभेच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष जयराम पवार व अध्यक्ष विलास चोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव प्रफुल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व कर्मचारीवृंद विशेष मेहनत घेत आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

