नागोठण्यात समाजसेवेचा भव्य जल्लोष; अनंत अंबानी वाढदिवसानिमित्त उपक्रमांची मेजवानी
दोन रुग्णवाहिका लोकार्पण, ३१ हजार नागरिकांना स्नेहभोजन, आदिवासी बांधवांना मदत आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांनी परिसर दुमदुमला
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक तथा अनंत युवा प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे परिसरात समाजसेवेचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळत आहे. विविध लोकहितकारी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श घालून देण्यात आला.
रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नागोठणे ते चोळे विभागासाठी अत्याधुनिक अशा दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. याच वेळी अपंग बांधवांना व्हीलचेअर, वॉकर व काठ्यांचे वितरण करून त्यांच्या जीवनाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनंत युवा प्रतिष्ठानचे सचिव धीरज घुले पाटील, सामाजिक कार्यकर्ते सद्दाम दफेदार, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
वाढदिवसानिमित्त ८ व ९ एप्रिल रोजी पेट्रोकेमिकल टाऊनशिप येथे सुमारे ३१ हजार नागरिकांसाठी भव्य स्नेहभोजन व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
तसेच आदिवासी बांधवांसाठी १५०० धान्य किट व १५०० वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात येत असून गंगावणे, चाफेवाडी, किल्लावाडी आदी सुमारे २० वाड्यांना याचा लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचीही विशेष काळजी घेत गणवेश, शालेय बॅग, पाण्याच्या बाटल्या व चॉकलेटचे वाटप सुरू असून सुमारे ३००० विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. स्वच्छता जनजागृतीसाठी प्रात्यक्षिके आयोजित करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न होत आहे.
याशिवाय ३१०० झाडांचे वृक्षारोपण, रुद्राभिषेक व गोदान यांसारखे विविध उपक्रमही राबविण्यात येणार असून, या सर्वांमुळे नागोठणे परिसरात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाजोपयोगी कार्यांच्या या मालिकेमुळे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागोठणे परिसरात एक वेगळाच प्रेरणादायी संदेश दिला जात आहे.

