नागोठण्यात रुग्णवाहिका लोकार्पणासह समाजसेवेचा जल्लोष : अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचा धडाका
दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण व ३१ हजार नागरिकांसाठी स्नेहभोजन, आदिवासी बांधवांना धान्य वाटप व विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) :
रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक व अनंत युवा प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे परिसरात समाजोपयोगी उपक्रमांचा भव्य धडाका पाहायला मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नागोठणे ते चोळे विभागासाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात अपंग व्यक्तींना व्हीलचेअर, वॉकर व काठ्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अनंत युवा प्रतिष्ठानचे सचिव धीरज घुले पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम दफेदार, मनसे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, शिवसेना विभाग प्रमुख प्रविण ताडकर, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे संचालक सिराजभाई पानसरे, विठोबाशेठ दंत, कामगार नेते संजय काकडे, अशोक भोय, उबाठा शिवसेनेचे इम्रान पानसरे, काँग्रेसचे असिफ मुल्ला, जोहेब कुरेशी, नागोठणे माजी सरपंच रियाजशेठ अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जहूरुद्दीन सय्यद, शब्बीरशेठ पानसरे, सगिर अधिकारी, प्रकाश मोरे, भास्कर म्हात्रे,यशवंत कुथे , सामाजिक कार्यकर्त्या रंजना माळी, स्मिता कुथे आदी मान्यवरांसह नागोठणे व चोळे परिसरातील ग्रामस्थ तसेच अनंत युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त ८ व ९ एप्रिल रोजी पेट्रोकेमिकल टाऊनशिप येथे सुमारे ३१ हजार लोकांसाठी स्नेहभोजन व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यासोबतच आदिवासी बांधवांसाठी मोफत धान्य वाटप, १५०० धान्य किट व १५०० वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले. गंगावणे, चाफेवाडी, किल्लावाडी आदी सुमारे २० आदिवासी वाड्यांना याचा लाभ होणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, शालेय बॅग, पाण्याच्या बाटल्या व चॉकलेटचे वाटप सुरू असून सुमारे ३००० विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रात्यक्षिकेही आयोजित करण्यात येत आहेत.
याशिवाय ३१०० झाडांचे वृक्षारोपण, रुद्राभिषेक व गोदान यांसारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या सर्व समाजोपयोगी कामांमुळे नागोठणे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

