नागोठण्यात गॅस टंचाईमुळे छोटे हॉटेल व्यावसायिक हतबल; हॉटेल बंद करण्याची वेळ
वाकणनाका (सुनिल कोकळे): नागोठणे परिसरात सध्या गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने छोटे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सलग काही दिवसांपासून गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
हॉटेल व्यवसाय हा पूर्णपणे गॅसवर अवलंबून असल्याने गॅस उपलब्ध न झाल्यास स्वयंपाक करणे अशक्य होते. त्यामुळे ग्राहकांना सेवा देणे कठीण होत असून, रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. अनेक लहान व्यावसायिकांचा उदरनिर्वाह हाच व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे.
स्थानिक हॉटेल चालकांनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “गॅस वेळेवर मिळाला नाही तर व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे,” असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर नागोठणे मधील काही गावकरी हॉटेल व्यावसायकांवर चक्क घरातीलच चुलीवर काही खाद्यपदार्थ बनवून दुकानात विकण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



