बनावट भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांचा संबंध? तपासात धक्कादायक माहिती
मुंबई (प्रतिनिधी)
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असून, या जाळ्यात काही राजकीय नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांचाही सहभाग असल्याची चर्चा समोर येत आहे.
तपासादरम्यान अशोक खरातच्या मोबाईलमधून अनेक उच्चप्रोफाइल नेत्यांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत. तसेच काही राजकीय नेते त्याच्या संपर्कात होते, त्याच्या दरबारात हजेरी लावत होते, असेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील काही नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एका महत्त्वाच्या घडामोडीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे समोर आले आहे. तसेच काही मंत्र्यांच्या निकटवर्तीयांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप करत, भोंदू बाबाच्या संपर्कात असलेल्या मंत्र्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. 
तपास यंत्रणा सध्या या सर्व राजकीय संबंधांची सखोल चौकशी करत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून अधिकृतपणे कोणत्याही नेत्याला आरोपी घोषित करण्यात आलेले नसून, तपास पूर्ण होईपर्यंत सर्व माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात आहे.

