लायन्स क्लब नागोठणेच्या सेवा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
: ८ ऑक्टोबरपर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : लायन्स क्लब नागोठणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताह अभियानाचा शुभारंभ गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नागोठणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात करण्यात आला. नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पुतळ्याच्या पायथ्याशी श्रीफळ वाढवून सेवा सप्ताहाचा अध्यक्ष लायन विलास चौलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
लायन्स क्लबच्या वतीने १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध समाजोपयोगी व जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये घरातील अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पर्यावरण स्वच्छता मोहीम, चाईल्ड कॅन्सर अवेअरनेस, मधुमेह तपासणी, सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन, नागोठणे शहर जनजागृती रॅली, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अन्नदान आदी विविध लोकहितकारी उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमांची माहिती लायन्स क्लबचे सचिव लायन डॉ. अनिल गिते यांनी उपस्थितांना दिली. लायन्स क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करताना सपोनि रविंद्र पारखे यांनी क्लबच्या विविध सेवाकार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष लायन विलास चौलकर, लायन प्रकाश जैन, लायन यशवंत चित्रे, लायन डॉ. अनिल गिते, लायन विवेक सुभेकर, लायन विजय शहासने, लायन दौलतराम मोदी, लायन सखाराम ताडकर, लायन दीपक गायकवाड, लायन सिद्धेश काळे, लायन अतुल काळे, लायन ॲड. महेंद्र धामणे, लायन अमित मोदी, लायन रतन हेंडे, लायन सुजाता जवके, लायन विद्या म्हात्रे, लायन दीपक लोणारी, लायन विवेक करडे तसेच कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन शाम लोखंडे, माजी अध्यक्ष लायन रविंद्र लोखंडे, लायन दिलीप मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब अध्यक्ष लायन विलास चौलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

