खारपाडा टोल हटवा, कोकण वाचवा! – अखिल कोळी समाजाचा जनआक्रोश : आंदोलनाला जाहीर पाठिंबा
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथील टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जन आक्रोश समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ, महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन कोळी व सरचिटणीस भावेश वैती यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.
संघाने दिलेल्या निवेदनात मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून अपूर्ण असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत जनतेकडून टोल वसूल करणे हा सरळसरळ अन्याय असल्याची भूमिका संघाने मांडली आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील टोल बंद करावा म्हणून २५ मे पासून जन आक्रोश समिती तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले असून अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ अध्यक्ष चंद्रकांत कोळी, पुंडलिक ताडकर, श्याम पाटील व तुळशीराम पारंगे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ तर्फे आंदोलनात सहभागी होऊन पाठींब्याचे पत्र दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला दररोज या मार्गाचा वापर करावा लागतो. स्थानिकांना टोलमाफी न दिल्याने त्यांच्या आर्थिक भारात वाढ होत असल्याचे संघाने म्हटले आहे. विशेषतः मासळी विक्रीसाठी पेण, पनवेल व मुंबई येथे जाणाऱ्या कोळी समाजातील महिला व मच्छीमार बांधवांना टोलचा मोठा फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या विचारांचा उल्लेख करत संघाने, “आमच्या मातीत आमच्यावरच जिझिया कर?” अशी गर्जना करत टोलविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे.
संघाने आपल्या मागण्यांमध्ये महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल नाका पूर्णपणे बंद ठेवावा, रायगड जिल्ह्यातील सर्व वाहनांना कायमस्वरूपी टोलमाफी द्यावी आणि आंदोलनकर्त्यांवर कोणतीही दडपशाही केल्यास अखिल कोळी समाज रस्त्यावर उतरेल, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जनआक्रोश समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असून आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
“खारपाडा टोल हटवा, कोकण वाचवा!” या घोषणेसह अखिल कोळी समाजाने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने टोलविरोधी लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.

