दिपक रानवडे यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्समधील कामगार संघटनेला आमदार महेंद्रशेठ दळवींचा ठाम पाठिंबा: रिलायन्स युनिटची नवी कार्यकारिणी जाहीर

दिपक रानवडे यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्समधील कामगार संघटनेला आमदार महेंद्रशेठ दळवींचा ठाम पाठिंबा: रिलायन्स युनिटची नवी कार्यकारिणी जाहीर

नागोठणे (शामकांत नेरपगार) :(दि.२९मे) “रिलायन्समध्ये दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा हीच आमची भूमिका राहील,” असे स्पष्ट मत आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी व्यक्त केले. रिलायन्सच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमधील भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या घोषणावेळी ते बोलत होते.
राजमाला (ता. अलिबाग) येथे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यालयात भारतीय श्रमिक शक्ती संघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, केंद्रीय कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे व केंद्रीय सरचिटणीस जिम्मी डे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २७) नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनमध्ये १ जून २०२६ पासून नवीन कार्यकारिणी कार्यरत होणार असून, अध्यक्षपदी किशोर शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
        नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष पंडित तुपकर, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज पेढावी व दिनेश शिर्के, उपाध्यक्ष अजित घरत, विनोद गोरे व राजकुमार राजभर, सरचिटणीस चंद्रकांत अडसुळे, सचिव यशवंत डाकी व प्रकाश तेरडे, सहसचिव संजय शिर्के, विठोबा कुथे, नरेश म्हात्रे, इस्माईल पिट्टू, खजिनदार असलम चोगले तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल जांबेकर, दीपक पाटील, राजेश जवके, सिताराम वारगे, सुभाष म्हात्रे व गणेश जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे. सल्लागार म्हणून सुभाष खराडे व मारुती दांडेकर, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. महेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
         यावेळी आमदार दळवी म्हणाले की, “कामगार क्षेत्रातूनच माझा प्रवास झाला आहे. युनियन चालविणे सोपे नसते. काळानुरूप बदलणे गरजेचे आहे. रिलायन्सच्या नवीन प्रकल्पाला आमचा विरोध नाही; मात्र स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील राहू.”
कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रिलायन्समधील सुमारे ७० टक्के कामगार भारतीय श्रमिक शक्ती संघाशी जोडलेले आहेत. संघटना हे एक कुटुंब असून नवीन पदाधिकाऱ्यांनी टीमवर्कच्या माध्यमातून काम करत कामगारांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
       दरम्यान, ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी संजय काकडे, सुधीर पारंगे, अजीम बेणसेकर, सुभाष ताडकर व महादू लाडगे यांचा सत्कार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, नगरसेविका सुजाता डाकी, नगरसेवक भूषण कडू, अशोक भोय, प्रकाश मोरे, भारती सिंगासने, मोहन भोय, विनोद गोरे यांच्यासह भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या रिलायन्स युनिटमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!