कानसई गावाची पारंपरिक रिगवणी उत्साहात संपन्न
वाकणनाका (सुनिल कोकळे ) – दि. २९ मे: कानसई गावची पारंपरिक रिगवणी यंदाही मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली. या प्रथेनुसार संपूर्ण गाव शुक्रवार (दि. २९ मे) या एक दिवसासाठी आपली घरे कुलूपबंद करून आपली गाई, गुरे, म्हशी, कुत्रे, मांजरे, कोंबड्या व इतर पाळीव प्राण्यांसह जवळील वनराई व आंबराई परिसरात जाऊन सुमारे १२ तास मुक्कामासाठी गेले होते. या निमित्ताने नातेवाईक, आप्तेष्ट व सगे-सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या आगळ्या वेगळ्या प्रथे संबंधी लोकनायक न्यूज पोर्टलचे वार्ताहर सुनिल कोकळे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन गावातील उच्चशिक्षित तरुण नागेश पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या परंपरेमागील इतिहास उलगडून सांगितला. ते म्हणाले की,पूर्वीच्या काळात गावात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत असत. उन्हाळ्याच्या दिवसांत कोंबड्यांना तसेच गाई, गुरे व म्हशींनाही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असे. या संकटांवर मात करण्यासाठी काही काळ गाव रिकामा केल्याने त्या ठिकाणचे रोगजंतू नष्ट होतात अशी पूर्वजांची समजूत होती त्यामुळे संपूर्ण गावकरी आपापल्या कुटुंबीयांसह आणि पाळीव प्राण्यांसह काही काळ गावाबाहेरील जवळच्या वनराईत जाऊन काही काळ वास्तव्यास राहत असत व आजही राहत आहेत.

या काळात संपूर्ण गावातील जेष्ठ मंडळीच्या वतीने गावदैवत श्री काळभैरव यांची विधिवत पूजा-अर्चा करून गाऱ्हाणे मांडले जाते. गावावर आलेली संकटे, रोगराई आणि आपत्ती दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच गाव देवाचा मानपान देवून गावावरील आपत्ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. याच श्रद्धा आणि परंपरेतून रिगवणीची प्रथा उदयास आली असून ती आजही जतन करण्यात येत आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पवार यांनी सांगितले की, ही परंपरा पूर्वी तब्बल आठवडाभर चालत असे. मात्र काळानुरूप बदल होत गेल्याने आता एक दिवस ही प्रथा पाळली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पशू-पक्षी व माणसांमध्ये पूर्वीसारखी रोगराई राहिलेली नाही. तरीदेखील आपल्या पूर्वजांची परंपरा जपण्याच्या उद्देशाने गावकरी आजही रिगवणीचे आयोजन करतात.

यावेळी गावातील पवार, ढाणे, हारपाळ, काते, शिंदे, भोईर,तटकरे आदी सगेसोयरे आपापली कुटुंबे घेवून वनराईत वास्तव्यास जातात व आपल्या नातेवाईकांना आमंत्रित करून त्यांचा आदरातिथ्याने सत्कार करतात व भोजनाची व्यवस्था करतात. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक एकोपा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव बनला असून गावाबाहेर मुंबई,पुणे तसेच ठाणे आदी ठिकाणी राहत असणारे सर्व गावकरी एकत्र येत असल्याने त्याला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे.
“आज एक दिवसाचा वनभोजनाचा कार्यक्रम असला तरी संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि गावकरी एकत्र येण्याचा आनंद काही वेगळाच असतो,” असे शेवटी पांडुरंग पवार यांनी सांगितले.

