नागोठणे हायवेनाका बसथांब्यावर एसटी थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल; परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

नागोठणे हायवेनाका बसथांब्यावर एसटी थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल; परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे हायवेनाक्यावरील बसथांब्यावर कोलाडकडे जाणाऱ्या अनेक एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.
                नागोठणे हे रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील महत्त्वाचे शहर असून परिसरातील अनेक गावांमधील नागरिक दैनंदिन कामानिमित्त येथे ये-जा करतात. तसेच येथे कोकण एज्युकेशन सोसायटीचे आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय असून इयत्ता ११ वी विज्ञान शाखेपासून बी.एस्सी. व एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेरगावाहून येतात.
महाविद्यालय सुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी हायवेनाक्यावरील बसथांब्यावर यावे लागते. मात्र कोलाडकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बस नागोठणे बसथांब्यावर न थांबता थेट उड्डाण पुलावरून कोलाडच्या दिशेने रवाना होत असल्याने प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अधिकृत बसथांबा आहे, त्या ठिकाणी अद्याप कोणत्याही प्रकारचे बसशेड अथवा प्रवासी निवारा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस आणि इतर प्रतिकूल हवामानात प्रवाशांना उघड्यावरच उभे राहावे लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
             या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी रायगड विभागीय परिवहन प्रशासनाला योग्य सूचना देऊन नागोठणे हायवेनाका येथील बसथांब्यावर कोलाडकडे जाणाऱ्या एसटी बसेस नियमित थांबविण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी बसशेड उभारून आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागोठणे परिसरातील प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.
            नागोठणेसारख्या शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रातील प्रवाशांच्या या समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान या संधर्भात जिल्हा एसटी वाहतूक नियंत्रक सुहास चौरे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले कि, नागोठणे हायवेनाका बसथांब्यावर कोलाडकडे जाणाऱ्या एसटी बस न थांबल्याबाबत प्रवाशांकडून होत असलेल्या हाला बाबत संबंधित चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभाग गंभीर असून या प्रकाराची चौकशी केली जाईल. तसेच नागोठणे परिसरात काही दिवस विशेष भरारी पथक तैनात करण्यात येणार असून संबंधित मार्गावरील एसटी बसच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा एसटी वाहतूक नियंत्रक सुहास चौरे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!