महाराष्ट्र पिंच्याक सिलाट संघात नागोठणे विभागाचा दबदबा; १० खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
नागोठणे (शामकांत नेरपगार ) : इंडोनेशियन मार्शल आर्ट्स प्रकारातील पिंच्याक सिलाट या खेळामध्ये नागोठणे विभागातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिनांक २५ ते २८ जून २०२६ दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या ज्युनिअर राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये रायगड जिल्ह्यातील नागोठणे विभागातील तब्बल १० खेळाडूंची निवड झाली आहे.
पिंच्याक सिलाट हा इंडोनेशियाचा पारंपरिक मार्शल आर्ट्स खेळ असून तो पाच विविध प्रकारांमध्ये खेळला जातो. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये श्रीयश शेडगे (नागोठणे), रियांश सारले (वरवठणे), जय गोळे (नागोठणे), शौर्य धसाडे (वणी), राकेश पवार (वेलशेत), प्रीत माळी (आंबेघर), जय कुलकर्णी (नागोठणे), शिवशांत सारगे (नागोठणे), प्रांजळ खारपुडे (नागोठणे) आणि अनिश पालकर (नागोठणे) यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना पिंच्याक सिलाटचे प्रशिक्षक मास्टर धनंजय जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मेहनतीमुळेच खेळाडूंनी हे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र संघात निवड झालेल्या या खेळाडूंचे नागोठणे विभागासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कौतुक होत असून त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीमुळे नागोठणे विभागाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून राष्ट्रीय स्तरावर रायगड जिल्ह्याचा झेंडा उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

