पावसाची केवळ सुरुवात, तरीही रेल्वे स्टेशनकडे जाणारा भुयारी मार्ग जलमय; ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

पावसाची केवळ सुरुवात, तरीही रेल्वे स्टेशनकडे जाणारा भुयारी मार्ग जलमय; ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

नागोठणे (शामकांत नेरपगार ) ): पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असतानाच नागोठणे येथील मुंबई-गोवा महामार्गावरील स्टेट बँकेसमोरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवासी व नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दररोज रेल्वे पकडण्यासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना चिखल आणि घाणीतून वाट काढावी लागत असून, रेल्वेची वेळ गाठण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे. पाण्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या परिस्थितीमुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाची केवळ सुरुवात असताना ही अवस्था असेल, तर मुसळधार पावसात परिस्थिती किती गंभीर होईल, याची चिंता प्रवासी व्यक्त करत आहेत.
भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्ग आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी निचरा व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करण्याचीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!