नागोठणे येथे श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; २१ व २२ जून रोजी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

नागोठणे येथे श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; २१ व २२ जून रोजी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – नागोठणे येथील मराठाआळी परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दि. २१ व २२ जून २०२६ रोजी करण्यात आले असून, या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या पवित्र आणि मंगलमय कार्यक्रमात परिसरातील भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात रविवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीदेवांच्या मूर्तींच्या भव्य मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच धर्मध्वज पूजन असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.


सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी द्वारपाल पूजन व मंदिर प्रवेश, विधान पूजन, महाअभिषेक, यज्ञकर्म आदी धार्मिक कार्यक्रमांनंतर सकाळी ११.३० वाजता नवीन देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे पौरोहित्य वेदोक्त पुरोहित श्री. शैलेश स्वामी व वेदोक्त आचार्य श्री. निखिल शास्त्री हे सहकाऱ्यांसह करणार आहेत.
यानंतर पूर्णाहुती, महाआरती, नवनाथांवरील प्रवचन, हरिपाठ, महाप्रसाद तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. भगवान महाराज कदम सर यांचे प्रवचन तसेच गायक प्रफुल नागोठणेकर व तबला वादक कौस्तुभ दिवेकर व सहकारी यांचे श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, नागोठणे यांचे भजन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
              समस्त ग्रामस्थ व महिला मंडळ, मराठाआळी तसेच कंपनी विभाग नागोठणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!