मुरावाडी व कोंडगावचा रस्ता ओलांडण्याचा मार्ग लवकरच खुला होणार खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे ग्रामस्थांना आश्वासन; आठ दिवसांत मार्ग काढण्याचे एनएचएआय अधिकाऱ्यांना निर्देश

मुरावाडी व कोंडगावचा रस्ता ओलांडण्याचा मार्ग लवकरच खुला होणार
खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे ग्रामस्थांना आश्वासन; आठ दिवसांत मार्ग काढण्याचे एनएचएआय अधिकाऱ्यांना निर्देश

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : पनवेल–इंदापूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) अंतर्गत नागोठणे हद्दीतील मुरावाडी तसेच कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगाव, कोंडगाव आदिवासीवाडी, कातळावाडी, पायरवाडी, तलईवाडी, भपक्याची वाडी, एकलघर आदी गावांतील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी असलेला मार्ग बंद करण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे तीन हजार ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


           या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके यांच्या नेतृत्वाखाली मुरावाडी–कोंडगाव तसेच परिसरातील आदिवासी गावांतील ग्रामस्थांनी सुतारवाडी (रोहा) येथील कार्यालयात खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके, चंद्रकांत ताडकर, निलेश वाघमारे, विद्याधर ताडकर, नामदेव ताडकर, प्रमोद चोगले, चेतन ताडकर, मधुकर ताडकर, प्रफुल ताडकर, सर्वेश दाभाडे, गणेश ताडकर, ज्ञानेश्वर मालुसरे, जयराम भस्मा, नितीन राजीवले, मोरेश्वर भस्मा, रावजी भस्मा, कुशा शिद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


         राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता ओलांडण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ व आर्थिक खर्च वाढला असून शेतीची कामे, जनावरांची ने-आण, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच रोजगाराच्या ठिकाणी जाण्या-येण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
            ग्रामस्थांची समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. लवकरच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन रस्ता ओलांडण्याचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीची गंभीर दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी इंगोले यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने लक्ष देण्याचे निर्देश दिले. ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये, यासाठी येत्या आठ दिवसांत या प्रश्नावर मार्ग काढा, असे स्पष्ट निर्देश खासदार तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
            खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने मुरावाडी, कोंडगाव व आदिवासी वाडी परिसरातील हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता ओलांडण्याचा मार्ग लवकरच खुला होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!