विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामस्थांनी घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरावी – सरपंच सुप्रिया महाडिक नागोठण्यात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामस्थांनी घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरावी – सरपंच सुप्रिया महाडिक नागोठण्यात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून स्वच्छता व आरोग्याला प्राधान्य देतानाच विकासकामांमध्ये पारदर्शकतेवर भर दिला जात आहे. मात्र, निधीअभावी विकासकामांना काही प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी केले.
भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा देताना त्यांनी नागोठणे गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गावात स्वच्छता, आरोग्य तसेच विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असून आगामी काळात नागोठण्यात अधिकाधिक विकासकामांना चालना देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.                                  यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरभाई जैन, श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त कमिटीचे सचिव दिलीपभाई टके, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अकलाख पानसरे, माजी सरपंच विलास चौलकर, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विविध बचत गटांच्या महिला, विविध मंडळांचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान, नागोठणे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांचा नागोठणे येथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली झाल्याने त्यांचा मार्गदर्शक किशोरभाई जैन, सरपंच सुप्रिया महाडिक व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
त्यानंतर नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मंदिर प्रांगणात उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


नागोठण्यात विविध ठिकाणीही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, को. ए. सो. गु. रा. अग्रवाल विद्यामंदिरमध्ये स्थानिक शाळा समिती अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, श्री जोगेश्वरी पतसंस्थेत संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, श्री अष्टविनायक पतसंस्थेत चेअरमन विलास चौलकर, नागोठणे पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे, तर नागोठणे लायन्स क्लब कार्यालयात अध्यक्ष ला. विलास चौलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अशा प्रकारे नागोठणे शहरात विविध शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!