रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वाकणनाका(सुनिल कोकळे)दि.१५ ऑगस्ट)-
रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन विविध देशभक्तिपर उपक्रम, प्रभातफेरी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

                 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच कोकण एज्युकेशन सोसायटी मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन संदीप गांगल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य अमित आठवले, विलास गुजर, नितीन जोशी, प्राचार्य रमेश मोसे, म.सि.गांगल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी, गोविंद राजे इंग्रजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सायली खरे, बालवाडी प्रमुख जयश्री जोशी, माजी शिक्षक-शिक्षिका, पालक, नागरिक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 सदर कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या देशभक्तिपर गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत तसेच विविध देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. एनसीसी कमांडर संदीप चांदोरकर यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत विद्यार्थ्यांकडून देशभक्तिपर घोषणा घेतल्या. विद्यार्थ्यांनी या घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

               दरम्यान शाळेच्या क्रीडा शिक्षिका समिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाची प्रतिज्ञा घेतली. तसेच तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांकडून बोलून घेतली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत व संचालन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

                सदरील स्वातंत्र्यदिन देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विशेष रंगत आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ शिक्षक नारायण पानसरे,किशोर पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!