रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रातच भरविण्याचे आदेश

रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रातच भरविण्याचे आदेश

वाकणनाका (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन न. जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश जारी केले आहेत.

           दरम्यान भारतीय हवामान विभागाने १८ जून रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या हवामानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

            यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार शाळांच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांनी दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात वर्ग भरवावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

             या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित शिक्षण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शाळा प्रशासनांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!