नागोठणेतील वारंवार वीजखंडितीचा प्रश्न विधान परिषदेत नेणार : आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे आश्वासन
नागोठणे-(शामकांत नेरपगार) – : नागोठणे व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच लघुउद्योगांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती सदस्या सौ. समृद्धी संतोष कोळी यांनी कोकण विभाग मतदारसंघाचे विधान परिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, प्रमोद जांबेकर, मनोज टके, रोशन पारंगे, ध्रुव सोष्टे, मोरेश्वर तेलंगे, नेत्रा पारंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात नागोठणे विभागातील वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. पूर्वी कानसई ते बाळसई दरम्यान वीजवाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यास एमआयडीसी वीजवाहिनीमार्फत पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात येत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र सध्या “एमआयडीसीवर लोड जास्त आहे” असे कारण देत पर्यायी वीजपुरवठा देण्यात येत नसल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली.
तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, पर्यायी वीजपुरवठा सुरू ठेवणे, अतिरिक्त क्षमतेची उपलब्धता, वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मरची तपासणी, आपत्कालीन पथकाची नियुक्ती, वरिष्ठ स्तरावरील बैठक तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन उपकेंद्र व फीडर उभारण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून नागोठणे विभागातील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नागोठणे विभागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

