पत्रकारांना धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

पत्रकारांना धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

नागोठणे (शामकांत नेरपगार ) – : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथितरित्या जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध करत रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य दिनेश ठमके, सौ. मंजुळा म्हात्रे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर करत “पुन्हा आलात तर मारून टाकीन” अशा स्वरूपाची कथित धमकी दिली. तसेच, यापूर्वीही “माझ्याकडे बॉम्ब आहे” अशा प्रकारची विधाने केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
       लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा घटनांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात होत असल्याची भावना पत्रकार असोसिएशनने व्यक्त केली आहे.
         यावेळी असोसिएशनने प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करणे, कथित धमकीच्या वक्तव्यांची सखोल चौकशी करणे, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कायदेशीर व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना धमकावण्याच्या घटनांवर कठोर कारवाई करून ठोस संदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!