रोहा येथील मेहेंदळे विद्यालयात एनसीसी ट्रूपतर्फे वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाकणनाका (सुनिल कोकळे) दि. २७ जून- रोहा येथीलकोकण एज्युकेशन सोसायटीचे मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार (दि.२७ जून)रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या ‘’एक पेड माँ के नाम’’ या अत्यंत सुंदर आणि प्रभावी मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. भू मातेच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करणे तसेच पर्यावरणाचे रक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी विद्यालयातील ‘‘6 महाराष्ट्र बटालियन मुंबई A’’ या एनसीसी ट्रूपच्या वतीने एनसीसी कमांडर संदीप चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शालेय परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांची आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक रोप लावून त्याचे उत्तम प्रकारे संगोपन करावे, ही या संकल्पनेमागील साधी पण प्रभावी पद्धत आहे. या वृक्षारोपणामुळे परिसरात हरित पट्टा वाढण्यास मदत होईल, हवा शुद्ध होईल आणि भावी पिढीसाठी एक निरोगी वसुंधरा तयार होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य रमेश मोसे, दुपारसत्र प्रमुख किशोर पाटील, सकाळ सत्र प्रमुख नारायण पानसरे, संग्राम गायकवाड यांच्यासह विद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एनसीसीचे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी रित्या संपन्न झाला.

