अवैध गावठी दारूवर रायगड पोलिसांचा हातोडा! चेराठी-काळकाई जंगलात नागोठणे पोलिसांची धडक कारवाई; 1.24 लाखांचा मुद्देमाल नष्ट

अवैध गावठी दारूवर रायगड पोलिसांचा हातोडा!
चेराठी-काळकाई जंगलात नागोठणे पोलिसांची धडक कारवाई; 1.24 लाखांचा मुद्देमाल नष्ट

नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेराठी-काळकाई जंगल परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत एकूण 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
शुक्रवार, दि. 19 जून रोजी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी, सहाय्यक फौजदार कृष्णा म्हात्रे, पोलीस हवालदार महेश लांगी, पोलीस हवालदार अथर्व पाटील, पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव व त्यांच्या पथकाने चेराठी-काळकाई जंगल परिसरात सुमारे 25 किलोमीटर आत जाऊन अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धाड टाकली.


             या कारवाईदरम्यान दोन ठिकाणी गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पहिल्या ठिकाणी 20 लिटर तयार गावठी दारू व 1000 लिटर गूळ मिश्रित रसायन असा सुमारे 52 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तर दुसऱ्या ठिकाणी 25 लिटर तयार गावठी दारू व 1400 लिटर गूळ मिश्रित रसायन असा सुमारे 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 109/26 व 110/26 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


                 सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!