रिलायन्स कंपनीचे अधिकारी रमेश धनावडे यांना ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान

रिलायन्स कंपनीचे अधिकारी रमेश धनावडे यांना ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्रा कडून नुकताच नागोठणे येथील रिलायन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रमेश धनावडे यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करून गौरवविण्यात आले. हा सोहळा चिंतामणराव देशमुख सभागृह रोहा येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी व्यासपीठावर टीव्ही ॲक्टर आणि बिग बॉस फेम जानवी किल्लेकर, दैनिक महासागरचे मालक व मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी आमदार अनिकेत तटकरे, कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष साहित्यिक रमेश धनावडे, सिटी बेल चॅनल मालक व पनवेल पत्रकार विकास मंचचे मंदार दोंदे, दैनिक महासागरचे रायगड जिल्हा प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे पीआरओ कुमार थत्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

धनावडे यांची मनतरंग, उर्मी, जीवनगाणे, कवितेच्या सुरातून, नादखुळा असेच काहीतरी, अशी सहा पुस्तके प्रकाशित असून त्यांचा’जीवनगाणे’ स्तंभ दैनिक कृषीवलमध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता. ‘गुदगुल्या’ या राजकीय व सामाजिक वात्रटिका दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. दैनिक रायगड टाईम्ससाठी त्यांच्या ‘बी पॉझिटिव्ह’ या डिजिटल मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा ‘कवितेच्या सुरातून’ हा महाराष्ट्रातील प्रख्यात कवींवरील स्तंभ दैनिक पुढारीमध्ये सलग दीड वर्ष प्रसिद्ध झाला आहे.

रमेश धनावडे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणून काम केले आहे. त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचन करून रसिकांची मने जिंकली आहेत. तसेच ते अलिबाग लायन्स क्लबचे माजी प्रेसिडेंट आहेत. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या मराठी चित्रपटासाठी त्यांचे गीत आर्या आंबेकर यांनी गायले आहे. ते अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून आमंत्रित असतात.

रमेश धनावडे यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कवितेच्या सुरातून या पुस्तकासाठी प्रथम पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र.वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार, दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार, म. ना. पाटील साहित्य पुरस्कार, असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

रमेश धनावडे यांना मिळालेल्या साहित्यातील रायगड रत्न पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. त्यांना मिळालेल्या या साहित्य पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!